मागील १० वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी; मतदार संघातील नागरिकांनी मानले आमदार पठारे यांचे आभार

लोहगाव : मागील १० वर्षांपासून लोहगाव ते खराडी या रस्त्यांमधील खांदवे वस्ती जवळ ३०० मीटरचे काम रखडले होते. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्याचे काम सुरु करावे यासाठी वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे प्रयत्नशील होते. परंतु सुस्त महापालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर शुक्रवारी आमदार बापूसाहेब पठारे आमरण उपोषणाला बसले होते. आमदार उपोषणाला बसताच महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. रस्त्याचे काम लवकरच करणार असल्याचे ठोस लेखी आश्वासन संबधित अधिकाऱ्यांनी दिले आणि तात्काळ रस्त्याचे देखील काम सुरु केल्याने आमदार पठारे यांनी उपोषण मागे घेतले. दहा वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरु झाल्याने मतदार संघातील नागरिकांनी आमदार पठारे यांचे आभार मानले.

मागील १० वर्षापासून लोहगाव ते खराडी या रस्त्यांमधील खांदवे वस्ती जवळ ३०० मीटरचे काम रखडले होते. यामुळे याठिकाणी अनेक अपघात झाले. खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्यांच्या आजाराला सामोरे जावे लागले. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचत असल्याने चिखल तयार होऊन वाहनचालक खड्ड्यात पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. याच रस्त्यावरून रोज हजारो वाहनांची रहदारी या कच्च्या रस्त्यांमधून सुरू होती. वाहन चालकांसह स्थानीक रहिवाशांना याचा प्रचंड त्रास होत होता. आमदार बापुसाहेब पठारे यांनी हा विषय हाती घेतला. आठ दिवसांपुर्वी महापालिकेच्या पथ विभाग प्रमुखांना पत्र देऊन हा रस्ता करण्याची मागणी केली. तरी देखील प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवार (दिनांक २ मे) रोजी सकाळी १० वाजले पासुन ते रात्री १० पर्यंत आमदारांनी पाणीही न घेता उपोषण केले. उपोषणावर ठाम राहून ४० डिग्री तापमान असताना उन्हात रस्त्याकडेला बसून होते. त्यामुळे संबधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली होती. येणाऱ्या अडचणी बाबत अधिकाऱ्यांशी व जागा मालकांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्यात आमदार बापूसाहेब पठारे यांनी यश मिळवले.
अखेर रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत ठोस लेखी आश्वासन देण्यात आले असून पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, उपायुक्त माधव जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय संकेश्वरी या महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने काम सुरू देखील करण्यात आले. जागा मालकांची समजूत काढल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थित रात्री उशिरा आमदार यांनी उपोषण मागे घेतले.
वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांनी मानले आभार
मागील अनेक वर्षे रखडलेल्या, वाहन चालकांना त्रास दायक ठरलेल्या या रस्त्याचे खांदवे वस्ती या ठिकाणचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पठारे कुटुंबीय, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने अन् सकारात्मक इच्छा शक्ती घेऊन आमदार बापुसाहेब पठारे यांनी हा विषय मार्गी लावला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापूर्वीचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असताना आमदार पठारे यांनी मात्र तात्काळ नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवल्याने वडगावशेरी मतदार संघातील नागरिक आमदार पठारे यांचे आभार व्यक्त करत आहेत.
लोहगाव परिसरात पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, रस्ते आदी कामे सुरु
वडगावशेरीचे आमदार बापुसाहेब पठारे यांच्या प्रयत्नामुळे लोहगाव ते खराडी ला जोडणारा फॉरेस्ट पार्क रस्त्याचे काम १० वर्षानंतर मार्गी लागले. लोहगावकरांसह वडगावशेरी मतदार संघातील नागरिकांनी ऋणी असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहे. आमदार उपोषणास बसताच याच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी तीन झाडे वृक्ष प्राधिकरण विभागाने काढली. नव्याने लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट सुरू नव्हते ते सुरू करण्यात आले. तसेच लोहगाव परिसरात पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, रस्ता आदी कामे सुरु असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.