क्रिकेट खेळताना बॉल लागून अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू

लोहगाव : क्रिकेट खेळत असताना बॉल अवघड जागेवर लागल्याने अकरा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना लोहगाव मधील जगद्गुरु इंटरनॅशनल शाळेजवळील स्पोर्ट्स अॅकडमी मध्ये गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शोर्य ऊर्फ शंभू कालिदास खांदवे (वय ११ रा. लोहगाव, पुणे) असे बॉल लागून मृत्यु झालेल्या मुलाचे नाव आहे.

विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहावी मध्ये शिकणारा शंभू हा शाळेला सुट्टया असल्याने गुरुवारी (२ मे) सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता. शंभूला खेळताना अचानक बॉल अवघड जाग्याला लागला. त्यावेळी तो मैदानात खाली पडला. अचानक पडल्याने इतर मुलेही गोंधळून गेली. मुलांनी आरडा ओरडा केल्याने खाली पडलेल्या शंभूला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. शंभूला डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. शंभूचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले. शंभूच्या अचानक मृत्यूमुळे खांदवे कुटुंबियांसह परिसरात शोककळा आहे. शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी बंडू खांदवे यांच्या भावचा मुलगा होता.

Share This:

WhatsApp
Facebook
X

Latest News

Scroll to Top