क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश; पिक विम्याची रक्कम होऊ लागली जमा

हिंगोली : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रभावी आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आल्याबद्दल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे पाटील यांचा गोरेगाव (ता. सेनगाव) येथील शेतकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रभावी आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १५८ कोटी ९० लाख रुपयांची पीकविमा रक्कम जमा होऊ लागली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. परंतु विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देण्यात टाळाटाळ केली जात होती. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभारून विविध आंदोलन, निवेदने, लोकप्रतिनिधींना जाब विचारणे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून सातत्याने आवाज उठवला. संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश आले असून पिक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे.
गोरेगावसह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा असून, संघटनेच्या लढ्यामुळे शेतीप्रधान भागात न्याय मिळवण्याची आशा अधिक बळकट झाली आहे.
नागरी सत्कार प्रसंगी बाबू पाटील, चेअरमन बबनराव पाटील, बजाज, प्रकाश (भाऊ) कावरखे, पी. एस. खिल्लारी, बाळू पाटील, अनिल पाटील, बंडू पाटील, गणेश कावरखे, विश्वनाथ खोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
या यशस्वी लढ्यामध्ये नामदेव पतंगे यांच्यासह कार्यकर्त्यांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची राहिली. शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पीकविमा रक्कमही तातडीने वर्ग व्हावी, यासाठी संघटना अधिक जोमाने पाठपुरावा करणार असून गरज भासल्यास पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार.
– गजानन कावरखे पाटील (अध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना, मराठवाडा)